यवतमाळ - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ क्लिप या तथाकथित आहे. जोपर्यंत सबळ पुरावे येत नाही तोपर्यंत, अशी बदनामी करू नये. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य हनन करायचे हे चुकीचे आहे. या प्रकरणात केवळ विरोधकांकडून बंजारा समाजाचे नेते आणि बंजारा समाजाला बदनाम करण्याची खेळी सुरू असल्याची टीका बंजारा समाजाकडून केली जात आहे.
याबाबत बंजारा समाजाच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया. पूजाने आत्महत्या केली, समाजाला का वेठीस धरता? पूजा चव्हाण हिने वैयक्तिक कारणाने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्या का केली याचे कुठलेही कारण समोर येत नाही. पोलिसांत कुणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कुण्या मंत्र्यांचे नावही आले नाही. केवळ ऑडिओ क्लिपद्वारे हे प्रकरण सुरू झाले आहे. या सर्व क्लिप बनावट असून यात खोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे यातून एखाद्या समाजाला वेठीस धरणे आणि राजकारण करणे चुकीचे आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात बंजारा समाज आहे. सत्य समोर येण्यापूर्वीच एखाद्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे.
हेही वाचा -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांकडून चौकशीचे आदेश
राजकीय पोळी शेकण्याचे काम -
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आता विरोधक राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत आहे. एखाद्या समाजाला समोर करून बदनाम करण्याचा घाट आणि यातून केला जात आहे. समाज येणाऱ्या काळात या कृतीला नक्कीच उत्तर देणार, अशी प्रतिक्रियाही समाजाच्या नेत्यांनी दिली आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या संदर्भात आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविले आहे. तर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले होते.
भाजपकडून कारवाईची मागणी
भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीचा दाखला देत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपची सखोल चौकशी करून पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.