यवतमाळ - जिल्हाआरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी दहा वाजून वीस मिनिटांनी अचानक भेट दिली. यावेळी तब्बल 28 दांडीबाज कर्मचारी आढळून आलेत. मुख्यालय असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची ही स्थिती आहे. तर जिल्ह्यातील 63 प्राथमिक आरोग्य केंद्र यांची काय स्थिती असेल असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. मात्र या भेटीने जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार व इतर कर्मचार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांची आरोग्य कार्यालयाला अचानक भेट गैरहजर असलेल्या सर्व 28 अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती कारवाईचा प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार यांनी सांगितले.
कार्यालयात सापडले 28 कर्मचारी दांडीबाज
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक होत आहे. अशातच आरोग्य विभागातील कर्मचारी गैरहजर असल्याच्या तक्रारी अध्यक्षांकडे येत होत्या. त्यामुळे डीएचओ कार्यालयात कार्यरत असलेले 17 कर्मचारी, प्रतिनियुक्तीवर असलेले तीन, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सात व वर्ग चारचे एक असे 28 कर्मचारी गैरहजर आढळून आले. काही कर्मचारी उशिराने कार्यालयात दाखल झाले. याबाबत अध्यक्ष पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधितांना गैरहजेरी तथा उशिरा येण्याचेबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. आरोग्य विभागातील औषध भांडार शाखेत भेट दिली असता, तेथील औषधी साठा रजिस्टरनुसार काही औषधी तपासण्यात आली. प्रत्यक्षात उपलब्ध औषधी व साठ्यातील नोंदी जुळत नसल्याने त्यात मोठी तफावत आढळून आली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र
हेही वाचा -अण्णा हजारे पुन्हा मैदानात..! लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संघटन उभारणार