यवतमाळ - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, शासनाने पुन्हा कडक निर्बंध लावावेत, विनाकारण फिरणाऱ्यांवर दुप्पटीने दंड आकारावा, मात्र लॉकडाऊन करू नये, अशी प्रतिक्रिया लघू व्यावसायिक, रोजंदारी मजूर व सामान्य नागरिकांतून उमटत आहे.
हेही वाचा -कचरा कंत्राट घोटाळा; टॅक्सीतून उचलला कचरा, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल
अंमलबजावणीत शासन फेल
यवतमाळ जिल्ह्यात दररोज 500 च्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. तसेच, रोज आठ ते दहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे, जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हा पर्याय नाही. शासनाने वेळोवेळी कडक नियम व संचारबंदी लागू केली आहे, मात्र या नियमांची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेकडून योग्यरित्या होत नाही. त्यामुळे, नागरिक बिनधास्तपणे गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे, अशा नागरिकांवर आणि जे व्यावसायिक आपल्या प्रतिष्ठानामध्ये नियमांची अंमलबजावणी करीत नाही, त्यांच्यावरती कारवाई केल्यास वाढणारी रुग्णसंख्या कमी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून मिळाली.
आमच्यावर उपासमारीची वेळ
मागील वर्षी नागरिकांनी लॉकडाऊनची परिस्थिती अनुभवली आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले. रस्त्याच्या कडेला उपजीविकेसाठी व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे, आता पुन्हा लॉकडाऊन लावणे म्हणजे नागरिकांवर मोठे संकटच येणार आहेत. त्यामुळे, शासनाने तसे न करता नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा -जिल्ह्यात अवकाळी पाऊस; शेतातील पिकांना बसला फटका