दारव्हा : यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथे शेतात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला घडली. मारोतराव सुरदसे (७०) पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (६५) आणि त्यांचा नातु सुमित विनोद सुरदसे (१६) अशी मृतांची नावे आहेत.
यवतमाळ : विजेच्या धक्क्याने आजी-आजोबासह नातवाचा मृत्यू - विजेच्या धक्क्याने आजी-आजोबासह नातवाचा मृत्यू
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथे शेतात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला घडली. मारोतराव सुरदसे (७०) पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (६५) आणि त्यांचा नातु सुमित विनोद सुरदसे (१६) अशी मृतांची नावे आहेत.
डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापुर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघेजण गेले होते. शेतातील लाईटजवळ मारोतराव यांना विजेचा शॉक लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी मनकर्णाबाई गेल्या. त्यांनाही विद्युत शॉक लागला. आजी आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हा त्यांच्याकडे धावला. तेव्हा त्यालाही विजेचा जोरदार शॉक लागला. त्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे डोल्हारी परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस ठाणे करीत आहे.