यवतमाळ - नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी मुरलीधर तिडके यांनी दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. कपाशीला जास्त बोंडेच न आल्याने त्यांना केवळ आतापर्यंत फक्त १० किलो कापूस निघालेला आहे. बोगस बियांणामुळे संपूर्ण हंगाम वाया गेल्याने त्यामुळे त्यांनी तालुका कृषी अधिकारी नामदेव कुमरे, तहसीलदार अमोल पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कंपनीचा शून्य प्रतिसाद -मुरलीधर तिडके यांनी दोन एकर शेतीमध्ये मनी मेकर कंपनीच्या तीन बॅग व जंगी कंपनीच्या दोन बॅग कापसाचीची लागवड केली आहे. परंतु दोन्ही कंपनीच्या कपाशीच्या झाडाला पाती आली. परंतु त्याचे बोंडात रूपांतर झाले नाही. याबद्दल त्यांनी दोन्ही कंपनीकडे वारंवार तक्रार करून विचारणा केली. दोन महिन्यापूर्वी कंपनीचे प्रतिनिधी हे स्वतः प्लॉट पाहायला आले होते. त्यांनी फवारणी करता औषधी सांगितली. दोन हजार रुपये किंमतीची औषधे स्वखर्चाने विकत घेऊन फवारले. परंतु आजपर्यंत कपाशीला दोन ते चारच बोंड छोट्या प्रमाणात आली. यानंतर बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीला वारंवार फोन केले. मात्र, कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.
कुटुंबाचा गाडा कसा हाकलायचा मोठा प्रश्नमुरलीधर तिडके यांचे चार जणांचे कुटुंब. पूर्ण उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून निघालेल्या उत्पन्नावर ते उदरनिर्वाह चालवितात. परंतु आज त्यांच्या घरात फक्त दहा किलो कापूस आला आहे. कपाशी सहा फूटपर्यंत वाढलेली असून हिरवीगार आहे. झाडाला अजूनही जवळपास 60 ते 70 पाती आहे. परंतु बोगस बियाणे असल्याकारणाने आतापर्यंत आलेल्या कितीतरी अशा पातीमधून बोंडाची निर्मिती झाली नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हताश झाला आहे.
खर्च पन्नास हजाराच्या घरातखत, मजुरी फवारणीसह इतर खर्च आतापर्यंत 50 हजाराच्या घरात आला आहे. हे सर्व पैसे उसनवार करून घेतले होते. ते परत करण्याची तर सोडा माझ्याकडे आज जगण्यासाठी पैसा सुद्धा शिल्लक नाही. त्यामुळे कंपनीच्या बोगस बियाणामुळे आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माझा कापूस प्लॉट अजूनही तसाच आहे. आपण प्रत्यक्ष येऊन त्याची चौकशी करू शकता, अशी मागणी कृषी व महसूल विभागाकडे मुरलीधर तिडके यांनी केली आहे.