यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 31 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना त्यांच्या घरी आरोग्य विभागाच्या निगराणीखाली क्वारंटाईन रहावे लागणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
नागपूर येथे तपासणीकरीता पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 11 एप्रिलच्या रात्रीपासून आतापर्यंत एकूण 74 रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. यापैकी 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून एक रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. हा व्यक्ती यवतमाळ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आला होता. तसेच गेल्या आठवड्यापासून तो आयसोलेशन वॉर्डात भरती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 9 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 154 जण आहेत. तसेच सोमवारी 15 नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहेत.