यवतमाळ -कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच तालुका प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दारव्हा, दिग्रस व पुसद येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
खबरदारीच्या दिल्या सूचना
सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी दारव्हा येथील डीसीएचसीला भेट देऊन पाहणी केली. तसेच शहरातील निधी मंगल कार्यालय व कविता मंगल कार्यालय या कोविड केअर सेंटरला भेट दिली. वरील तिनही ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांना बाहेरचे कोणी भेटायला येता कामा नये, याबाबत येथील प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या. तसेच सीसीसीची क्षमता किती, सद्यस्थितीत येथे किती रुग्ण भरती आहेत, नियमित स्वच्छता होते की नाही, याबाबत विचारणा करण्यात आली.
दोन किराणा दुकानांवर कारवाई
शहरातून फेरफटका मारत असताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन किराणा दुकानांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. दोन्ही दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये याप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिग्रस व पुसद येथे भेट देऊन उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर आणि आयुर्वेदिक कॉलेजला भेट दिली व तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला.