यवतमाळ- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपीक पदाची परीक्षा वेळेवर रद्द झाल्यामुळे परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. त्याचबरोबर ग्रामीण भागातील उमेदवारांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यावेळी परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या या ढिसाळ कारभारासंदर्भात कारवाई करावी, तसेच अमरावती येथील एमएसआयएसटी कंपनीला कंत्राट देण्यात आल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 147 पदाची लिपीक परीक्षा 20, 21, 22 जूनला घेण्यात येणार होती. मात्र, आजच्या पहिल्याच दिवशी परीक्षेच्या काही मिनीटांपूर्वी ही परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनीटच आगोदर परीक्षार्थींना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यासंदर्भातले पत्रक परीक्षा केंद्रावर लावण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. विशेष म्हणजे ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने बाहेर जिल्ह्यातील परीक्षार्थींना मोठा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. यानंतर परिक्षार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 147 कनिष्ठ लिपीक पदासाठी 7 हजारांवर अर्ज तर चपराशी पदासाठी दीड हजार अर्ज आले होते.