यवतमाळ -बँकेत पैसे काढण्याकरता आलेल्या वृद्धाला अज्ञात व्यक्तीने फसवल्याची घटना मारेगाव येथे घडली. लखमा कोंडेकर (७४, रा.घोगुलदरा) असे या वृद्धाचे नाव आहे.
वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास; यवतमाळ येथील घटना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या कोंडेकर यांनी एका अनोळखी व्यक्तीकडून पावती लिहून मागितली. त्यावर दोन हजार रुपये रक्कम टाकण्यास सांगितले. याचा फायदा घेत चोरट्याने दहा हजार रक्कम पावतीवर टाकली. रोखपालाने दहा हजार रुपये वृद्ध व्यक्तीस दिल्यानंतर चोरट्याने मी पैसे मोजून देतो, असे सांगितले. यावर कोंडेकर यांनी दहा हजार कशाला काढले म्हणताच, ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी बसणाऱ्या साहेबांकडे आठ हजार बँकेत जमा करू असे चोरट्याने सांगितले. यानंतर, वृद्ध व्यक्तीस दुचाकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले. साहेबांची सही घेतो असे सांगून वृद्धास दुचाकीवरून उतरवले आणि चोरटा रोकड घेऊन फरार झाला. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घडलेल्या प्रकाराची घोगुलदरा गावचे सरपंच तुकाराम आस्वले यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर वृद्ध पोळा सणाची खरेदी करण्यासाठी बँकेतून २ हजार रुपये काढण्याकरता आले होते.