यवतमाळ -महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेचा कौल देऊन 11 दिवस उलटले. तरीही मुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती मिळविण्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये टोकाचे वाद सुरु असून हे त्रांगडे सुटलेले नाही. महायुतीने सरकार लवकर स्थापन करावे. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी काँग्रेसचे नेते वसंत पुरके यांनी राळेगाव येथे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
महायुतीने सरकार स्थापन करावे यासाठी काँग्रेसने केले धरणे आंदोलन
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सत्तास्पानेचा कौल दिला आहे. आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महायुतीने सरकार स्थापन करावे, अशी मागणी काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी केली. यावेळी यवतमाळ काँग्रेसने राळेगाव उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केली.
मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी तरी आता भांडणे थांबवा, असे आर्जव पुरकेंनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना केली. सद्यस्थितीत असलेले सरकार हे काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. आर्थिक विषयांत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन ते घ्यायचे असतात. त्यासाठी नवीन सरकार तत्काळ स्थापन होणे गरजेचे आहे. आधी अतिवृष्टीने आणि आता परतीच्या पावसाने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. अशा वेळी खुर्चीसाठी भांडत राहाणे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे जनतेचा कौल प्राप्त झालेल्या नेत्यांना शोभत नाही. जनतेच्या त्यांच्यावरील रोष दिवसागणिक वाढतो आहे. त्याचा उद्रेक होण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती द्यावी. शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी आपसातील भांडणे मिटवून लवकर सत्ता स्थापन करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पुरके यांनी केली आहे.