यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पोफाळी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बिबी येथे मागील अनेक दिवसापासून गावठी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे आज (शुक्रवार) या गावातील महिलांनी आणि नवतरुण मंडळाने गावातील 4 ते 5 दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू, मोह आणि दारू गाळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.
दारू गाळण्याच्या साहित्याची तपासणी करताना पोलीस आणि बिबी गावच्या महिला हेही वाचा -'आम्हाला नकोय दारूचे दुकान', माथोली गावातील महिलांचा एल्गार
दारूमुळे गावातील अनेकांचा संसार उध्वस्त होत आहे. भांडण-तंटे मोठ्या प्रमाणात सुरू होते. ही अवैध दारू बंद करण्यासाठी बिबी येथील महिलांनी पुढाकार घेऊन पोफाळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास भगत यांना दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती दिली. त्यानंतर भगत यांनी बिबी गावात दारूबंदी करण्यासाठी गावातल्या नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच दारू विक्रेत्यांना दारू बंद करा, अशा सूचना दिल्या. मात्र, दारू विक्रेत्यांनी दारू बंद केली नाही. त्यामुळे गावातील नवतरुण मंडळ आणि महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू गाळण्याचे साहित्य जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा -चंद्रपुरात देशीदारूच्या दोन कोटीच्या साठ्यावर पोलिसांनी चालवला रोलर
घटनेनंतर पोलिसांना अवैध दारू पकडण्यासाठी सामान्य महिलांचा पुढाकार घ्यावा लागल्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उभे झाले आहे.