यवतमाळ-दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावातील महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्पना अंकुश चव्हाण (२५), मुलगा युवराज (५) व मुलगी गुडिया (3) अशी मृतांची नावे आहेत.
यवतमाळ: दिग्रस तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - well
सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दिग्रस पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
![यवतमाळ: दिग्रस तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3435520-689-3435520-1559305801116.jpg)
कल्पना या आपल्या दोन चिमुकल्यांसह हातणी (ता. दारव्हा) येथून आपल्या माहेरी मांडवा या गावी आल्या होत्या. त्या कालपासून तणावात असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले होते. कल्पना यांनी आज सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान गणेश म्हात्रे यांच्या शिवारातील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्यांसह उडी मारून आत्महत्या केली. सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे शवविच्छेदन केले गेले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच दिग्रस पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संगरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे करत आहे.