यवतमाळ - अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. या परिस्थितीत विमा कंपन्यांनी दावा मंजुरीकरीता शेतकऱ्यांची नाहक अडवणूक केल्यास विमा कंपन्या व त्यांच्या प्रतिनिधींना सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला. राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत देण्याची ग्वाही दिली.
हेही वाचा -मारेगाव येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला वणीत; खून झाल्याचा संशय
गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची वर्गवारी करता येणार नसून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे हाच पर्याय आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी हीच शासनाचीही भूमिका असल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचे छायाचित्रे घेऊन साध्या कागदावर अर्ज केला तरी पुरेसे आहे. सोयाबीन, कापसासह आंतरपिके, फळबागा, भाजीपाला सर्वच पिकांचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देऊ, असा विश्वास संजय राठोड यांनी नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.