यवतमाळ- कोरोना व्हायरसच्या दहशतीने जगातील अनेक व्यवहार ठप्प केले आहे, तिथे महाराष्ट्रातील लग्नाचे मुहूर्त कसे सुटतील. राज्यातील अनेक लग्नाळूंना त्यांचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. मात्र यवतमाळच्या एका युवतीने कोरोनामुळे दोनवेळा लग्न पुढे ढकलले गेल्यानंतर दुचाकीवरुन थेट नवऱ्या मुलाचे घर गाठून तिथेच लग्न थाटले आहे. या लग्नाला ना वऱ्हाडी, ना वधूचे आई वडील उपस्थित होते.
दोनवेळा हुकला लग्नाचा मुहूर्त
यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात राहणाऱ्या सुकेशनी दडांजे या मुलीचा विवाह बाबुळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील प्रवीण भणारकर या तरुणासोबत 9 मार्चला ठरला होता. मुला-मुलीकडच्या मंडळींनी जोरदार तयारी केली. लग्नपत्रिका छापल्या, दरम्यान कोरोनाचा विळखा वाढतात चालला असल्याचे लक्षात आल्याने अशा परिस्थितीत कोणाला कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी समंजस भूमिकेतून 9 मार्च या तारखेचा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुढे कोरोना संसर्ग कमी होईल, अशी आशा करून तो विवाह 31 मार्चला करण्याचे ठरवले. मात्र, दुसऱ्या वेळी सुध्दा नियोजित विवाह कोरोनामुळे झाला नाही.