यवतमाळ -देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. शहरी भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठी ग्रामस्थांची आजही वणवण भटकंती सुरू आहे. अशा भयावह अवस्थेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही गोकुळ हेटीवासीयांना जगावे लागत आहे.
लहान मुलांना करावी लागतेय पायपीट
यवतमाळ तालुक्यात बोथबोडनपासून एक किलोमीटर अंतरावर गोकुळ हेटी हे गाव आहे. बोथबोडन ग्रामपंचायत येथे नळ योजना कार्यान्वित आहे. गोकुळ हेटी येथे पाइपलाइन टाकून आहे. विहिरीला पाणी आहे. पण एक किलो मीटरवरील गोकुळ येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिलांसोबत लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
'दुधाळ जनावरांना कसे जगवावे?'
गोकुळ हेटी या गावात गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. प्रत्येक व्यक्तीकडे 50 ते 100 जनावरे आहे. दुभत्या जनावरांना कसे जगावावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. बोरवेल रिकामे झाले आहे. 2005मध्ये पाइप लाइन टाकून नळ कनेक्शन दिले होते. गावातील विहिरीवरून येथे योजना आहे. पूर्वी1987 मध्ये या विहिरीवरून बोथबोडन व गोकुळ हेटी येथे या योजनेतून पाणीपुरवठा होता. आता पाइपलाइन चोकअप झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकूणच विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी गोकुळ हेटी येथील समस्या बघून सरकारचा दावा किती फोल आहे, हे दिसून येते.