महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता यवतमाळातही कोरोनासह साथरोगांचे निदान होणार, वैद्यकीय महाविद्यालयात 'व्हीआरडीएल लॅब'चे उद्घाटन - कोरोना चाचणी सुविधा यवतमाळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढळलेल्या रुग्णांच्या तपासणीकरता घेण्यात आलेले स्वॅब हे नागपूरला पाठविण्यात यायचे. त्यांच्या अहवाल उशिरा प्राप्त होत होता. मात्र, आता यवतमाळमध्ये व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली असून या प्रयोगशाळेत कोव्हीडचे नमुनेच नाही तर सर्व साथींच्या रोगांचे तसेच एचआयव्ही, चिकनगुनीया, डेंग्यू आदींचे नमुने तपासणी करून निदान करण्यात येणार आहे.

आता कोरोनासह साथरोगांचे निदान होणार
आता कोरोनासह साथरोगांचे निदान होणार

By

Published : Jun 3, 2020, 8:05 PM IST

यवतमाळ - आधी कोरोनाचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील लॅबवर अवलंबून होतो. मात्र, नमुने तपासणीच्या अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्यामुळे कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळातच होणार आहे. आज (बुधवार) पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत परदेशातून मशीन आणणे, विविध स्तरावर परवानगी घेणे, हे सर्व जोखमीचे काम होते. त्यातच या मशीन सिंगापूरला अडकल्या. त्यामुळे ही प्रयोगशाळा यवतमाळ येथे सुरू होणार की नाही, याबद्दल मनात शंका निर्माण होत होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणेने आलेल्या अडचणींवर मात करून हे शक्य करून दाखविले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुरुवातीला दुबई, मरकज आणि आता मुंबई-पुणे येथून आलेल्या लोकांमुळे वाढली. या बाधित असलेल्या लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविल्यानंतर रिपोर्ट यायला उशीर लागत होता. त्यामुळे हे लोक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळत नव्हते. दरम्यान पॉझिटिव्ह असलेले लोक कुठे-कुठे फिरले, किती लोकांच्या संपर्कात आले, याचा अंदाजच लागत नव्हता. मात्र, आता कोरोनाची लक्षणे असलेले नमुने इतरत्र पाठविण्याची गरज नाही. तसेच त्याचे निदान यवतमाळ येथे होणार असल्याने उपचार मिळण्यास मदत होईल. केवळ कोव्हीडचे नमुनेच नाही तर या प्रयोगशाळेत सर्व साथींच्या रोगांचे तसेच एचआयव्ही, चिकनगुनीया, डेंग्यू आदींचे नमुने तपासणी करून निदान करण्यात येणार आहे.

आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अतिशय चांगले आहे. आरोग्य विभागामुळे सर्वांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कोरोना विरुध्दच्या या युध्दात सर्वांनी प्रशंसनीय काम केले असले तरी ही लढाई संपलेली नाही. सर्व योध्दे व नागरिकांच्या सहकार्याने ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासन आणि प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तबलिगी लोकांचे नमुने 1 एप्रिलला तपासणीकरीता पाठविले मात्र त्याचा रिपोर्ट 8 एप्रिलला प्राप्त झाला. हे रिपोर्ट एक-दोन दिवसातच मिळाले असते तर एवढा संसर्ग झाला नसता. आठ दिवसाच्या विलंबामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला. येथे प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी खनीज विकास निधीतून 3.50 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. प्रयोगशाळा जरी कार्यान्वित झाली असली तरी जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रयोगशाळेविषयी माहिती देतांना डॉ. गुजर म्हणाले, ही प्रयोगशाळा मायक्रोबॉयलॉजी विभागांतर्गत कार्यान्वित राहणार आहे. वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी 13 मशीनचा एक संपूर्ण सेट आहे. 24 तासात जवळपास 125 ते 150 चाचण्या करता येऊ शकतात. येथे कार्यरत डॉक्टर आणि स्टाफचे नमुन्यांच्या निदानाबाबत नागपूर एम्स येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details