यवतमाळ - अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी जिल्ह्यात आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 16 तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच यवतमाळ तहसिल कार्यालयात दोन, असे 19 मतदान केंद्र आहेत. तर सात हजार 459 शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना -
मतदान केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी निवडणूक विभागामार्फत घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावर कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रत्येक शिक्षकांची तपासणी करूनच आत मतदानासाठी सोडण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षक मतदाराला पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून तापमान मोजूनच मतदान कक्षात सोडण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक आरोग्य पथकाची नेमणूक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. एखादा शिक्षक मतदार जर पॉझिटिव्ह आला तर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आयसोलेशन वार्डही या ठिकाणी उभारण्यात आला आहे.