यवतमाळ -तीनशे मीटरचा रस्ता, ५५ फूट उंची, सात हजार बांबू, दीड हजार लोखंडी पाइप, लोखंडी गडर पोल, याच्या माध्यमातून बालाजी दुर्गा उत्सव मंडळाने वैष्णोदेवी धामची प्रतिकृती साकारली आहे. हा देखावा साकारण्यासाठी ३५ कारागीर ३० दिवस अहोरात्र परिश्रम घेत होते. यवतमाळ जिल्ह्यातील नवरात्रोत्सव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भव्यदिव्य देखावे, नऊ दिवस चालणारे लंगर ही वैशिष्ट्ये आहेत. हे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक जिल्ह्यात येत असतात.
यवतमाळमध्ये बालाजी दुर्गा उत्सव मंडळाने साकारली 'वैष्णोदेवी धाम'ची प्रतिकृती - यवतमाळ नवरात्रोत्सव बातमी
यवतमाळच्या बालाजी दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी नवरात्री निमित्त वैष्णोदेवी धामची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतीकृती साकारण्यासाठी ३५ कारागीर ३० दिवस अहोरात्र परिश्रम घेत होतो.
यंदाही यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी तसे देखावे तयार करण्यात आलेले आहेत. गेल्या ५४ वर्षांपासून बालाजी चौक मंडळ आपले देखावे, लंगर यासाठी जिल्हाभरात नावाजलेले आहे. यंदा या मंडळाने 'वैष्णोदेवी धाम' मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून काम सुरू होते. या ठिकाणी पहाडी रस्ता, भैरव घाटी, बाण गंगा, चरण पादुका मंदिर, अर्ध कुवारी मंदिर, सांझी छल, हेलिपॅड, नवीन ताराकोट मार्ग, हिमकोरी प्राचीन गुहा, वैष्णोदेवी त्रिपिडी स्वरूप, भैरव मंदिर आदी दृश्य साकारण्यात आली आहेत. यासाठी कलकत्ता येथील ३५ कारागिरांचे एक पथक रात्रंदिवस काम करत होते.
२६ वर्षांपासून नऊ दिवस महाप्रसाद या ठिकाणी सुरू असतो. यंदा या लंगरसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना दररोज १०० डब्बे पाठविले जाणार आहेत. बालाजी मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. वीरपत्नी, वीरमाता यांचा गौरव, शेतकरी विधवांना शिलाई यंत्राचे वाटप, असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यंदा स्वच्छता मोहीम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याकरता मंडळाचे अध्यक्ष रवी राय, मंडळाचे मार्गदर्शक सुभाष राय, विजय राय, राजू गोटफोडे, विनोद शर्मा, अनिल चुरा, नरेश वर्मा, देवीलाल श्रीवास्तव, दौलत शर्मा इतर पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.