यवतमाळ - जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव तालुक्यात सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरु होता. दरम्यान सायंकाळी वणी, मारेगाव तालुक्यात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. सुमारे तासभर बरसलेल्या या पावसाने उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. तर पावसामुळे भाजीपाला पिके, फळबागांना मोठा फटका बसला.
संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती -
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांचे जीव टांगणीला लागलेला आहे. खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला, त्यात रब्बी पिकांवर आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती. ती अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने हिरावले. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगला अडचणीत आला आहे. बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा आहे.
हेही वाचा - आत्महत्येसाठी २२ वर्षीय तरुणी चढली ५ मजली इमारतीवर, पोलिसांनी समजूत घालण्याचा केला प्रयत्न