यवतमाळ - बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिक विजय सुरेश वर्मा यांच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेला एकूण 17 लांखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. विषेश म्हणजे विजय वर्मा हे दुकानात साफसफाई करीत असताना चोरट्याने संधी साधून 17 लाखांचा ऐवज असलेली ही बॅग लंपास केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर, स्थानिक गुन्हेशाखा पथक घटनास्थळी दाखल झाले.
सराफा व्यावसायिकाच्या दुकानातून 17 लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास
दुकानाचे शटर उघडून सोबत असलेली काळ्या रंगाची बॅग त्यांनी दुकानाच्या काऊंटर मागील खुर्चीवर ठेवली. त्यानंतर ते दुकानाची साफसफाई करण्यात व्यस्त झाले. दरम्यान ते दुकानाच्या बाहेरील कचरा साफ करीत असताना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवुन असलेल्या एका युवकाने दुकानात शिरत ती दागिने आणि रक्कम असलेली बॅग लंपास केली.
विजय वर्मा दुकानात परत आल्यावर त्यांना बॅग दिसली नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुजेच तपासले असता, एक युवक बॅग घेवुन दुकानातून बाहेर गेल्याचे निदर्शानास आले. त्यावरून त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, चोरी करणारा युवक हा पल्सरवर आलेल्या दुचाकीस्वाराच्या सोबत फरार झाला.
बॅगेत बारा लाखांचे सोने
विजय वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बॅगेमध्ये अंदाजे 12 लाख रुपयांचे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे 14 हजार रुपयांचे 200 ग्रॅम चांदी किंमत आणि रोख रक्कम 5 लाख रुपये असा एकूण 17 लाख 14 हजार रुपये इतका ऐवज होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे. दिवसा ढवळ्या क्षणात घडलेल्या या प्रकाराने परिसरातील व्यावसायिकांना धक्का बसला. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी उसळली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहेत.