यवतमाळ- वणी तालुक्यातील कैलासनगर वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाचे जाम झालेले टाके साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून याला वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे
.वणी परिसरात जवळपास १० ते ११ कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेकोलीने सदनिका बांधल्या आहेत. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुगोली कोळसा खाणीची कैलासनगर येथे वसाहत आहे. या वसाहतीतील दोन शौचालयाचे टाके जाम झाल्याने वेकोली प्रशासनाने सुनील शर्मा वेकोली कंत्राटदारा त्याची साफ सफाई करण्याची जबाबदारी दिली.
पंचायत समिती सदस्य संजय निखाडे ही सफाई करण्याकरिता यनक या गावातील मारोती वाघमारे (२७) व हनुमान कोडपे,( २३) हे दोन मजुर आज सकाळी दहा वाजता उतरले. मात्र, टाक्यात उतरल्यावर टाक्यातील विषारी गँसने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दिवसभर याची साधी कल्पना कोणाला नव्हती. सायंकाळी वसाहतीतील मुले खेळत असतांना त्यांचा चेंडू टाक्या जवळ गेल्याने हे दोघे मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ही वार्ता वसाहतीत पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरपूर पोलीसांना माहिती देण्यात आली व रेस्क्यू वाहना सह पथक घटनास्थळी दाखल झाले. वेकोली अधिकारीही दाखल झाले. कामगारांना सुरक्षा साधन ठेकेदाराकडुन देण्यात आले नाही, म्हणुन दोन कामगारांचा मृत्यु झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केला. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.