यवतमाळ : आर्णी मार्गवरील वाघाडी जवळील पेट्रोल पंपाजवळ हातात देशी पिस्तूल घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका देशी पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे, एक वाहन आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव ढवळे (21) आणि अभिनव लांडगे(20) दोघेही राहणार सावर, ता. बाभुळगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंग झडतीत मिळाले देशी पिस्तूल
आर्णी रोडवरील मनदेव मार्गाने यवतमाळकडे दुचाकीने येणारे दोन तरुण वाघाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ हातात देशी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करीत होते. याबाबतची गोपनीय माहिती अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अभिनव लांडगे याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे आढळून आली. दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -27 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी बँक मॅनेजरसह 9 जणांविरोधात गुन्हा