यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रत्येक तालुक्यात, गावातही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, या ठिकाणी योग्य सुविधा मिळत नसल्याच्या रूग्णांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन तालुक्यातील कोविड केंद्रावर उत्तम सोयी, दर्जेदार भोजन आणि रूग्णांना कोरोनाचा ताण येऊ नये, यासाठी मनोजरंजनाकरीता टीव्ही, वाचनाकरिता वृत्तपत्रांची व्यवस्था करावी, अशा सूचना आमदार संजय राठोड यांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कोविड केअर सेंटरवर टीव्ही, वाय-फाय, वृत्तपत्रे, मासिके उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले आहेत.
गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश -
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कोविड केअर केंद्रात आणल्यापासून तुरूंगात डांबले की काय, अशी परिस्थिती असल्याची व्यथा अनेक रूग्णांनी या भेटीत संजय राठोड यांच्याकडे मांडली. केंद्रातील अस्वच्छता, बिछाण्यांची अपुरी व्यवस्था, निकृष्ट जेवण, पिण्याच्या पाण्याची अव्यवस्था आदींसंदर्भात रूग्णांना तक्रारी केल्या. त्याची दखल घेत संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी व सीईओंशी चर्चा करून कोविड केंद्रावर दाखल रूग्णांची गैरसोय होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले.