यवतमाळ -केंद्र शासनाने आणलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकरी वारकरी संघटना व किसान ब्रिगेडच्या वतीने शहराच्या विविध भागातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
कृषी कायदे भांडवलदारांच्या हिताचे -
केंद्र शासनाने अमलात आणलेले तीन कृषी विषयक कायद्यांमुळे केवळ उद्योजकांचे हित जोपासले जाणार असून शेतकरी देशोधडीला लागणार आहे. ज्या वेळेस पासून हे कायदे अमलात आणले त्यावेळेपासून शेतकऱ्यांनी विविध आंदोलने केली आहे. मात्र, शासनाने याची कुठलीच दखल घेतली नाही. दिल्ली येथे शेतकऱ्यानी या कायद्या विरोधात मोठे आंदोलन उभारले आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी ही ट्रॅक्टर रैली काढण्यात आली.
सभागृहात चर्चा न करता कायदे अमलात -
शेतकऱ्यांच्या हिताचे हे तीन कृषी कायदे असल्याचा उहापोह केंद्रशासन करत आहे. मात्र, सभागृहांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे कायदे पारित करण्यात आले आहेत. इतर वेळी कुठलेही कायदे लागू करताना केंद्र सरकार त्याचा मोठा गाजावाजा करतात. मात्र, हे कायदे पारित करताना त्यांनी सभागृहात चर्चा न करता बहुमताच्या जोरावर पारित केले. त्यामुळे हे कायदे रद्द होणार नाहीत, तोपर्यंत देशातील कुठलाच शेतकरी स्वस्थ बसणार नाही. शेतकरी हिताचे कायदे अमलात आणावे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.