यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्यालगतच्या अंधारवाडी, वासरी, कोपमंडवी आणि कोब्बा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अंधारवाडी गावालगतच्या शिवारात बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. अमरावती आणि यवतमाळच्या 16 जनांच्या पथकाने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही धाडसी कारवाई केली आबे. यानंतर वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्राकडे रवाना करण्यात आले. प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे.
यवतमाळच्या पांढरकवडा वनक्षेत्रात मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या टिपेश्वर T2C1 या वाघिणीला 31 डिसेंबरपर्यंत पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे बेशुध्द करून बंदीस्त करण्याची मंजुरी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली होती. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ग्रामप्रमुख व वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाघिणीला बंदिस्त करण्याबाबतचा ठराव पाठविला होता. टिपेश्वर अभयारण्यतील T2C1 वाघीणीचे अस्वाभाविक वर्तन लक्षात घेता, तिने केलेल्या शिकारी व मनुष्यहाणीच्या घटना 15 दिवसात झाल्याने तसेच वाघीणीची निश्चित टेरेटरी नसल्याने व शेतीचा हंगाम सुरू असल्याने भविष्यात आणखी मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण एकच असून ती 18 ते 20 महिन्यांची असावी असा अंदाज आहे. पाटणबोरी वनपरिक्षेत्रात अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई या परसिरात वावरत असलेल्या वाघिणीस पिंजराबंद व बेशुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.
वनविभागाच्यावतीने अंधारवाडी शिवारात एक बकरी बांधून ठेवण्यात आली होती. तिची शिकार करण्यासाठी ती आली असता तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. अमरावती येथील आठ आणि यवतमाळ येथील आठ अशा 16 जनांच्या पथकाने ही कारवाई केली. यात डॉ. चेतन(नागपूर), डॉ. घाटारे (अमरावती), अमोल गावणेर (मेळघाट) यांनी प्रमुख जबाबदारी पार पाडली.