यवतमाळ- उन्हाळ्याच्या दिवसात टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होते. यामुळे पर्यटकांची या अभयारण्याला पसंती मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ यासह अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी जंगल सफर करण्यासाठी येत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असलेल्या या अभयारण्यात काही अंतरावरूनच हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकही सुखावून जात आहेत.
हमखास व्याघ्रदर्शन होणारे टिपेश्वर अभयारण्य वेधतोय पर्यटकांचे लक्ष - Nilesh Falke.
उन्हाळ्याच्या दिवसात टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होते. यामुळे पर्यटकांची या अभयारण्याला पसंती मिळत आहे.
हमखास होणारे व्याघ्रदर्शन म्हणून टिपेश्वर अभयारण्य अल्पावधीतच ख्याती प्राप्त केल्याने मागील मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंग करून पर्यटक याठिकाणी हजेरी लावत आहेत. पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या घाटजी आणि केळापूर या दोन तालुक्यात १४८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे वन्यजीव अभयारण्य विस्तारलेले आहेत. पर्यटकांना या अभयारण्यात जाण्यासाठी सुन्ना व माथनी दोन गेट आहे. सुन्ना या गेटवरून ११ वाहने तर माथनी या गेटवरून १२ वाहने सकाळी ५.३० ते ७ आणि दुपारी ३ ते ४.३० या कालावधीत सोडण्यात येतात. २०१८ मध्ये १ हजार ५०४ वाहनांतून ७ हजार पर्यटकांनी भेट दिली. तर या वर्षात सुरुवातीपासूनच संपूर्ण ऑनलाईन बुकिंग फुल असल्याचेही वन्यजीव अभयारण्याकडून सांगण्यात आले.
पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या या अभयारण्याची निर्मिती १९९७ साली करण्यात आली. मात्र, मारेगाव तालुक्यातील काही गाव आणि टिपेश्वर या गावांचे पुनर्वसन करण्यात आल्याने या अभयारण्यात वाघांसह इतर प्राण्यांचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या अभयारण्यात वाघ, नीलगाय, रानकुत्रे, कोल्हा, अस्वल, चितळ, सांबर, चांदी अस्वल, मोर यासह इतर प्राण्यांचे अस्तित्व आहे. अभयारण्याच्या भागामध्ये नैसर्गिक पानवटे तसेच सोलार पंप लावून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यांमध्ये पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा आणि हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांची पसंती मिळत असल्याची माहिती पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी दिली.