मुकुटबन वन परिक्षेत्रात वाघाची शिकार; दोन पंजे नेले कापून
मुकुटबन वन परिक्षेत्रात वाघाची शिकार झाली आहे. या वाघाचे दोन पंजे कापून नेले आहेत.
यवतमाळ -मुकुटबन परिक्षेत्राच्या मागुर्ला राखीव वन कक्ष क्रमांक 30 मध्ये नाल्याच्या गुहेजवळ मृतावस्थेत एक वाघ आढळला. या वाघाच्या गळ्यात तारेचा फास होते. त्याला अणुकुचीदार हत्याराने मारल्याचे दिसून येत आहे. गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचेही प्रथमदर्शनी दिसत आहे. हा वाघ मादी असून अंदाजे 4 वर्ष वयाची होती. वाघिणीचे पुढचे दोन पंजेही तोडून नेले आहेत. यामुळे या वाघाची शिकार करण्यात आल्याचा संशय असल्याचे विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी सांगितले
घटनास्थळी अधिकाऱ्याकडून पाहणी -
पांढरकवडा वनविभागंतर्गत मुकुटवन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्र. 30 मध्ये वन्यप्राणी वाघ मृत झाल्याची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक पांढरकवडा, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. जी. वारे (मुकुटबन), प्रकाश महाजन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांचे प्रतिनिधी तसेच डॉ. रमजान विरानी मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण दिल्ली यांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थितीची पाहाणी केली
घटनास्थळी शवविच्छेदन -
पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, पेंच व्याघ्र प्रकल्प(नागपूर), डॉ. अरून जाधव, डॉ. एस. एस.चव्हाण ( झरी), डॉ. डी. जी. जाधव, (मुकुटबन) व डॉ. व्ही. सी. जागडे (मारेगाव) यांच्या मार्फत घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले, असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक वनसंरक्षक पांढरकवडा हे करत आहेत.