यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र कमी आणि वाघांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच या अभयारण्यातील तीन वाघ मराठवाड्यातील किनवट परिसरात पोहोचले असून जंगलात भ्रमंती करीत असल्याचे आढळून आले आहे. यातील एक वाघ खराबी भागात तर दोन वाघ नजीकच्या मांडवा भागात वनविभागाच्या पथकाला आढळले. सुमारे तीन ते चार वर्ष वय असलेल्या या वाघाने पहिल्यांदाच त्या भागातील पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याचे वन विभागाने सांगितले.
टिपेश्वरमधील तीन वाघ मराठवाड्यात; क्षेत्र कमी आणि वाघाची संख्या जास्त रेकॉर्डवर 20 तर प्रत्यक्षात 32 वाघ -
टिपेश्वर अभयारण्यात वन विभागाच्या रेकॉर्डवर 19 ते 20 वाघांची नोंद आहे. तर प्रत्यक्षात या अभयारण्यात 30 ते 32 वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या टिपेश्वर अभयारण्याच्या क्षेत्राच्या चौपट आहे. वन्यजीव तज्ञांच्या मतानुसार नर वाघाला दिवसासाठी किमान 80 चौरस किलोमीटर तर मादी वाघाला 20 चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र 148 चौरस किलोमीटर एवढेच आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त आठ ते दहा वाघ संचार करू शकतात.
अभयारण्याचे क्षेत्र पडत आहे कमी -
वाघांच्या संख्येच्या तुलनेत करण्याचे अभयारण्यचे क्षेत्र हे कमी पडत आहे. बछडे साधारणत: दीड ते दोन वर्ष झाले की, त्यांची आई त्यांना जवळ ठेवत नाही. त्यामुळे नर वाघ आपले क्षेत्र शोधण्यासाठी बाहेर पडत असल्याचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) सुभाष पुरानीक यांनी सांगितले. तर वन्यजीव अभ्यासक प्रा. धर्मेंद्र तेलगोटे यांना विचारणा केली असता टिपेश्वर मधील वाघांचा इतर ठिकाणी होणारा संचार थांबवायचा असेल तर अभयारण्याला टायगर प्रोजेक्टचा दर्जा देणे तसेच अभयारण्याच्या सीमा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.