यवतमाळ - घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असून या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे.
चौकशीचे आदेश
बारा लहान मुलांना मळमळीचा त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रात्री उशिरा उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात धाव घेत मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत.