यवतमाळ -आर्णी तालुक्यातील परसोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर पुनर्भरनाचे काम केवळ कागदोपत्री दाखवून रक्कम हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील 32 अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. काम न करता विहीर पुनर्भरणचे पैसे परस्पर हडप करण्यात आले. यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
परसोडा शेतकरी विहीर पुनर्भरण प्रकरण
माहिती अधिकारात झाली पोलखोल
रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरी सभोवताल विहीर पुनर्भरण करण्यात येते. मात्र, ग्रामपंचायतीचे सचिव आणि पंचायत समितीतील अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत केले. यात आर्णी तालुक्यातील परसोडा येथील जवळपास 32 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी सभोवताल कागदोपत्रीच विहीर पुनर्भरण करण्यात आले. एका विहिरीसाठी तीस हजार रुपये एवढा खर्चही दाखवण्यात आला. ही रक्कम ठेकेदार व प्रशासनातील अधिकारी यांनी संगनमताने उचलण्यात आली. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राठोड यांनी माहितीचा अधिकारात मागविली असता गावातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उगडकीस आले आहे.
आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा
झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Maratha Reservation : कोल्हापुरात उद्या 'मूक आंदोलन'; आंदोलस्थळाची संभाजीराजेंनी केली पाहणी