यवतमाळ : येथे काल(सोमवार) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली. त्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून 768.021 कुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातील 13ही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे.
इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल (सोमवार) रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे, इसापूर धरणाचे 2, 14, 8 क्रमांकाचे दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. तर, 7, 9, 6, 10, 5, 11, 4, 12, 3 व 13 या क्रमांकाचे दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. या तेराही दरवाज्यातून पेनगंगा नदीपात्रात 768.021 क्युसेक (27123 क्युसेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 935.4460 द.ल.घ.मी.असून पाणी पातळी 440.70 मीटर इतकी आहे.