यवतमाळ - जिल्ह्यातील 22 घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात आले आहे. फिरोजखान उर्फ रंडो साहेबखान (रा. पुसद) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 14 लाख 45 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके आणि श्रीकांत जिंदमवार यांचे एक विशेष पथक मागील काही दिवसांपासून गुन्हेगाराचा मागोवा घेत होते. अशातच फिरोजखान हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटी वाहनाने पुसद येथे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून पुसद येथील भोजला टीटी पॉईंटजवळ त्याला अटक करण्यात आली. त्याची कसून तपासणी केली असता यवतमाळ, पुसद, उमरखेड, दारवा, आर्णी, महागाव आणि कळंब या पोलीस ठाण्यांतर्गत 22 घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली.