यवतमाळ : यवतमाळमध्ये दोन चोरट्यांना ( theft in Yavatmal ) हुडकून काढून पोलिसांनी त्यांच्याकडून 390 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड असा एकूण 22 लाख 67 हजार 53 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई 21 डिसेंबरला दुपारी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. यासंबंधीची माहिती आज गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड :शेर अली ऊर्फ रहिम मोती सैय्यद (22) रा. इंदिरानगर, यवतमाळ आणि विक्की किसन सारवे (24) रा. गौतमनगर, यवतमाळ अशी अटकेतील चोरट्यांची नावे ( Two arrested in theft incident ) आहेत. येथील अरुणोदय सोसायटीतील हिरालाल ऊर्फ पन्ना गयाप्रसाद जयस्वाल (42) यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील काढून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तब्बल आठ लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख 85 हजारांची रोकड असा एकूण 15 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ( Police seized Gold silver cash from thieves ) होता. ही घटना 11 डिसेंबरला सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध भादंवि 454, 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने घराच्या अवतीभोवतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी केली. तेव्हा दोन चोरटे नखशिखांत वस्त्रे परिधान करून असलेले आढळून आले होते. शिवाय, काही अंतरावर त्यांचे वाहन आढळले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी बारकाईने तपास केला.