यवतमाळ -शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवत अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावचे राजेश सवने यांनी मागील तीन वर्षांपासूनच्या केळी उत्पादनात आलेल्या अनेक अडचणीवर मात करत आपल्या शेतीला ऊभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्यावर्षी उन्हाचे तर दुसऱ्यावर्षी कोरोनाचा संकट
राजेश सवने यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण, पहिल्या वर्षी उन्हाळा आल्याने त्या वर्षीची बाग जळून गेली तेव्हा त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा फळधारणा झाली आणि कापणीला आले तेव्हा कोरोना प्रादुर्भावाने पाय पसरले होते. त्यामुळे गगनाला असलेले केळीचे भाव कवडीमोल झाले. त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
संकटातून काढला मार्ग
संकट ओढावल्यानंतर स्वतः केळीवर प्रक्रिया करून विकायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वतः विक्री केली. त्यामध्ये जेमतेम पैसे मिळत होते. शेतीतील संकटातून सावरायचे असेल तर नवनवीन प्रयोग केल्यास निदान उत्पादन खर्च तरी निघेल या हेतूने शेतातच केळीवर प्रक्रिया उद्योग सुरू केला.
कच्च्या केळीपासून चिप्स विक्री सुरू
यावर्षी केळी पिकावर विशेष प्रक्रिया करून विक्री करण्याचे ठरविले. आपल्या शेतातच कच्य्या केळींपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. यासाठी राजस्थानहून चिप्सची मशीन आणली. उत्पादन आधी स्थानिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. यासाठी तयार केळी चिप्स अत्यंत माफक दरामध्ये विक्री सुरू केली. या सर्व घडामोडीतून राजेश सवने यांनी शेतीवरील अडचणीवर मात केली आहे. शिवाय यातून चार बेरोजगारांना कायम स्वरूपी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. सध्या स्थनिक बाजारात याची विक्री करत असून लवकरच याला नाव देऊन ब्रँडिंग करण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : राज्यातील 'या' गावात मतदार 89 अन् उमेदवार 12