यवतमाळ - यावर्षी कधी नव्हे ते संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर चहूबाजूंनी कोसळले आहे. सुरुवातीला सोयाबीन पाण्यामुळे मातीमोल झाले. तर, आता कपाशीवर गुलाबी बोंडळीने आक्रमण केल्याने हे पीकसुद्धा हातचे गेले आहे. शेतात आले की कपाशीचे बोंड पाहून डोळ्यात आसू येते. अशातच आमदार, खासदार आणि प्रशासन एसीमध्ये बसून निवाडा करतात. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी पैसा कुठून आणायचा आणि जगावं तरी कसे, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे.
शेतात आले की डोळ्यात पाणी येते; शेतकऱ्यांची हृदयविकारक प्रतिक्रिया - यवतमाळ शेतपीक नुकसान बातमी
शेतकऱ्यांवर चहूबाजूनी संकट कोसळले आहे. सोयाबीन पाण्यामुळे मातीमोल झाल्याने तसेच कपाशीवर गुलाबी बोंडळीने आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतात आले की पीक बघून डोळ्यात पाणी येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, कपाशीवर आलेली बोंडअळी हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. एकरी एक ते दीड क्विंटल कापूस निघणार असल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र, प्रशासन अद्यापही या नुकसानीचे पंचनामे करीत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे दुरापास्त होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी दिल्या, त्यावर केवळ कृषी विभागाचे कर्मचारी शेतात जाऊन पाहणी करत आहे. मात्र, शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कुठलेच आदेश नसल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी सांगितले.