मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळतील. त्यात एकाही दिवसाचा विलंब होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
शिक्षकांनाही विनाविलंब मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, शिक्षक परिषदेला वित्तमंत्र्यांचे आश्वासन - सुधीर मुनगंटीवार
राज्यातील शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
मागील २ दिवसांपासून राज्यभरात शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी विलंब होत असल्याचा दावा काही शिक्षक संघटनांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार गाणार, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. यासाठी २ दिवसांपासून गाणार मंत्रालयातच ठाण मांडून बसल्याने आज दुपारी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन वितमंत्र्यांनी दिले. त्यामुळे शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातवा वेतन आयोगाचे लाभ मिळणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी 'ईनाडू इंडिया'शी बोलताना दिली.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तत्काळ शासन निर्णय काढला जावा तसेच फेब्रुवारी २०१९ ची वेतन देयके ही सातव्या वेतन आयोगानुसारच काढण्याचे आदेश द्यावेत, जानेवारी २०१९ ची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी फेब्रुवारीच्या वेतन देयकात समाविष्ठ करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर कार्यवाही होणार असल्याची माहिती दराडे यांनी दिली.