यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर वाढतच चाललेला आहे. यवतमाळ शहरासह इतर तालुक्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार, चहाटपरी, उपहारगृह, पानटपरी यासह इतर दुकानदारांना कोविडची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यामुळे जोपर्यंत तपासणी करणार नाही तोपर्यंत दुकाने सील करण्यात येणार, असा इशारा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिला. ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, अशा दुकानदारांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रुग्णांचा दर 13 टक्क्यांवर -
जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा दर 13 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसाला 250 ते 300 बाधितांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे हा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणायचा असेल तर सर्वांची तपासणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच तालुका नियम तपासणी चाचण्यांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. 16 तालुक्यातील सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ तसेच दुकानदार, लघु व्यावसायिक, रास्तभाव दुकानदार अशा विविध आस्थापनामधील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मोहीम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.