यवतमाळ- नगर परिषदेच्या घंटागाडी चालक आणि मदतनीस कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे वाहनचालक व मदतनीस यांनी संप पुकारला आहे. थकीत वेतन मिळेपर्यंत कामबंद ठेवणार, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेला दिला आहे.
तीन महिन्याचे वेतन द्या तरच कामावर येऊ; घंटागाडी चालक अन् मदतनीसाचा संप
यवतमाळ नगरपरिषदेच्या घंटागाडी चालक व मदतनीस यांना तीन महिन्यांपासून परिषदेकडून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी वेतन होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
यवतमाळ शहरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून वाहने खरेदी केली. त्यावर चालक आणि मदतनीस म्हणून 124 जणांची नियुक्ती केली. लॉकडाऊनपासून चालक व मदतनीस आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांना वेतन मिळाले नाही. कर्मचाऱ्यांनी पालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना केवळ आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात वेतन दिले नाही. संप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहरात कचरा तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये आमच्याकडून तीन महिने काम करून घेतले. मात्र, वेतन देण्यात आले नाही. अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले. आता पुढे सण आहेत. खिशात एकही रुपया नाही. त्यामुळे संप करण्याचा निर्णय घेतले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.