यवतमाळ- अवघ्या अर्धा एकर जागेमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे भरघोस उत्पादन घेत, मिरचीची यशस्वी शेती एका शेतकऱ्याने केली आहे. यात त्याला लाखोंचा नफा मिळाला आहे. सुरज महारतळे असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
शेती केली अन् मिळवला लाखोंचा नफा; सोनापूरच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा हेही वाचा -चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..
वकिली व्यवसायासह शेती करणाऱ्या सुरजची वणी तालुक्यातील सोनापूर गावात 3 एकर शेतजमीन आहे. त्यातील 20 गुंठ्यांत त्याने 'पॉली हाऊस' उभारले आहे. त्यात शिमला मिरचीच्या रोपांची नागमोड्या पध्दतीने लागवड केली आहे. या 6 हजार 500 रोपांची जुलै महिन्यात लागवड करण्यात आली होती. आता एका झाडाला 3 किलो मिरची लागली आहे. या रोपांची उंची साधारण 10 फूट उंच होते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी दोरीच्या साहाय्याने बांधण्यात येते.
सूरजने आतापर्यंत 70 क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे. अजून मार्च अखेर पर्यंत 125, क्विंटल उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. या सर्वातून 15 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हंगाम अखेर पर्यंत अडीच लाखांचा कामासाठी खर्च झाला आहे. तो वगळता 12 लाखांचा निव्वळ नफा मिळणार असल्याचे सुरजने सांगितले. या शेतातील शिमला मिरची पिवळ्या आणि लाल रंगाची असून, तिला नागपूर, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे मोठी मागणी आहे.