यवतमाळ- गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. आज देशात पर्यावरण संरक्षण आणि उर्जा बचतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल इंधनाची बचत करण्यासाठी पूसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांची ही निर्मिती उर्जा बचतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जात आहे.
शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होत आहे. शिवाय प्रदूषणही होत आहे. त्याचबरोबर, या वाहनांमुळे वाहतूक कोडीही होते. यावर उपाय म्हणून नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले आणि ई-सायकलची निर्मिती केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सायकल, इलेक्ट्रिक मोटर, लीड अॅसिड बॅटरी, चार्जर, सायक्लोमीटर या साधनांचा उपयोग केला. पुढे सायकलच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. विद्यार्थ्यांनी या ई-सायकलची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.