यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017अंतर्गत कर्जमाफी आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीमध्ये पात्र असूनही मागील तीन वर्षांपासून यवतमाळमधील शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. घाटंजी, यवतमाळ, आर्णी तालुक्यातील तब्बल 269 शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. शासनाला वारंवार निवेदने, मोर्चे काढूनही कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आज पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून यवतमाळ शहर पोलिसांनी 73 तर घाटंजी पोलिसांनी 35 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध कर्जमाफी कधी मिळेल?
शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार होते. मात्र यवतमाळमधील आर्णी रोड, कोलंबी फाटा आणि घाटंजी सह इतर ठिकाणाहून 108 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी दक्षता भवन येथे स्थानबद्ध केले. यावेळी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांवर संकटाची मालिका
खरीप हंगामात शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत. सुरुवातीला बोगस बियाणांचा फटका, दुबार पेरणी तसेच कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्यातच अवकाळी पावसाने कापूस आणि सोयाबीन पिक गेले. अशा विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अजुनही कर्जमाफी आणि दुष्काळी मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांकडे लक्ष वेधणार होते. यासाठी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता.
हेही वाचा -15 दिवस मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज - महापौर
महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
आपल्या मागण्यांसाठी शेतकरी येणार असल्याने आर्मी घाटंजी या मार्गावर शेतकऱ्यांना बाहेर रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गावर चोख बंदोबस्त लावण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालया समोरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. सर्व शेतकरी घाटंजी, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यातील होते. शासनाने आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला.
हेही वाचा -धक्कादायक! करचुकवेगिरीने देशाचे दरवर्षी ७५ हजार कोटींचे नुकसान