यवतमाळ - गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने जिल्हा प्रशासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. तसेच नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. दुकानांच्या वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आल्या आहे. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, पांढरकवडा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. या संदर्भात बोलताना नागरिकांनी नियमांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी म्हटले.
एक वर्षापासून सुरू आहे लढा -
मागील एक वर्षापासून कोरोनासोबतचा लढा सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, हे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात आले. तरीदेखील नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली. लग्न व सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी केल्याने कोरोनोचा संसर्ग वाढण्यास मदतच झाली आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. उपासमारीची वेळ आली. यातून सावरत असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी मायक्रो सिलिंग केल्या जात आहे. बॅरिकेट्स लावले जात आहे. ग्रामीण भागातही पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा पुन्हा कोरोनाच्या पहिल्या पायरीवर आल्याचे दिसत आहे.