यवतमाळ -22 वर्षीय तरुणाच्या खुनानंतर गोरसेनेच्यावतीने शुक्रवारी १७ डिसेंबरला पुसद येथे महाआक्रोश मोर्चाचे ( Gorsenas Aakrosh Morcha in Yavatmal ) आयोजन केले आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. आक्रोश मोर्चात सहभागी झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने ( Yavatmal SP on Mahaakrosh Morcha ) दिला आहे.
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे ३ डिसेंबरला श्याम राठोड या २२ वर्षाच्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून तलवारीने निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर परिसरात दगडफेक, जाळपोळची घटना घडली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाच जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात केले आहेत.
हेही वाचा-सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका
काळी दौलतखानमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, घटनेच्या निषेधार्थ गोरसेनेच्यावतीने शुक्रवारी १७ डिसेंबरला पुसद येथे महाआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून महाआक्रोश मोर्चा काढू नये, असे सांगितले. मात्र, गोरसेना मोर्चा काढण्यावर ठाम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली. या महाआक्रोश मोर्चात कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील ( SP Dilip Bhujbal on Gorsenas Aakrosh ) यांनी केले आहे. सहभागी झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.