यवतमाळ - यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. न उगवलेले बियाणे, दुबार पेरणी आणि आता पेरल्यानंतर उगवलेल्या सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
आधी बोगस बीयाणं, मग दुबार पेरणी..आता पीक पिवळं पडल्याने सोयाबीन शेती संकटात! कापूस उत्पादकांसोबतच यंदा सोयाबीनची पेरणी वाढली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या समस्यांमुळे हैराण झाले आहेत. अंकुरलेल्या सोयाबीनच्या रोपांची पानं अचानक पिवळी पडू लागली. तसेच अनेक रोपं कोमेजू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारली. त्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. बियाणं बोगस निघाल्याने सोयाबीन उगवलेच नाही. आता जे बियाणे उगवले आहे, ते अचानक पिवळे पडू लागले आहे. रोपं सुकत आहेत. सोयाबीन वर नेमका रोग तरी कोणता पडलाय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून पिकाच्या नुकसानाची भीती आणखी वाढली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. सोयाबीनचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे व उपाययोजना मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी संभ्रमित झाले आहे. सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची प्रमुख कारणे अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होणे यामागे आहेत. परिमाणी पीक वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता उद्भवल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडते. अधिक पावसामुळे जमिनीमध्ये अधिक ओलावा राहिल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते.
जमिनीतील अन्नद्रव्ये उदा. नत्र, लोह व पालाश यांची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात. तसेच खोड किडल्याने त्याचा प्रादुर्भाव आणखी वाढतो; आणि पाने पिवळी पडतात. त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर अथवा निबोळी अर्क वापरावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.
खोडकिडीचा प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के असल्यास आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्याचे समजून त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र कृषी विभाग अद्याप कोणतीही मदत पुरवत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.