यवतमाळ - जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन कमी कुटार जास्त निघाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.
घाटंजी तालुक्यातील कोपरी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. ज्या झाडाला शेंगा लागल्या त्यात दानेच लागले नसल्याने कोपरी गावातील शेतकरी संकटात सापडले आहे. कोपरी गावातील एका शेतकऱ्याने त्यांच्या चार एकर शेतात त्यांनी जून महिन्यात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, आता त्यांच्या शेतात केवळ 50 किलो सोयाबीन झाले आहे. बियाणे, खत, फवारणी, योग्य काळजी घेतली. मात्र, सोयाबीन वाळलेल्या काड्या शेतात राहिल्या आहेत. यात त्यांचा लागवड खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झाली आहे. आता पुढे कुटुंब कस चालवायचे याचा प्रश्न त्यांना पडला आहे.