यवतमाळ - परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक हातातून गेले. तर शिल्लक असलेले सोयाबीन काळे पडून खराब झाले. बहुतांश पिकाचे तर मातेरे झाले आहेत. त्यामुळे केलेला खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. प्रशासनाने अद्यापही नुकसानाचे पंचनामे केलेले नाही.
सोयाबीन हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शिवाय कमी कालवधीत उत्पादन येत असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. यवतमाळ तालुक्यातील वाई येथील किसन काळे यांनी पाच एकरमध्ये सोयाबीन पेरले. बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन पेरल्यानंतर बियाण्यांची उगवण क्षमता कमी होती. त्यानंतर पाऊस जास्त आल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केल्यानंतर खर्चात मोठी वाढ झाली. पीक मोठे झाल्यावर सोयाबीनवर खोडकिडी आली. त्यामुळे हाताशी आलेले पीक खराब झाले. त्यातच ऐन काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने शिल्लक असलेल्या पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे काळे यांनी पाच एकर सोयाबीनमध्ये केवळ अकरा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. यातील अर्ध्यापेक्षा अधिक सोयाबीन पूर्णतः काळे पडले आहे. त्यामुळे हे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेल्यास कोणीही खरेदी करणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन लागवडीसाठी काळे यांना एकरी सात ते आठ हजार रुपयांचा खर्च आला.