यवतमाळ - जिल्ह्याच्या अनेक भागात सोयाबीन पिकांवर आता खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जिल्ह्यातील महागाव, पुसद, उमरखेड, यवतमाळ, कळंब, घाटंजी या तालुक्यासह इतरही भागात जवळपास 200 हेक्टरवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुरुवातीला बोगस बियाणे उगविले नाही. परिणामी दुबार पेरणी करावी लागली. त्यात सोयाबीन पिवळे पडले असून खोडकिड खोडमाशीने पीक पोखरले आहे. या किडीमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे पुढे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ - यवतमाळ बातमी
हिवरी गावातील शेख अन्सार यांच्या साडेतीन एकरावरील सोयाबीन 50 टक्के पिवळे पडले असून त्याच्या खोडात खोडकीड आली आहे. शेख अन्सार यांनी शेतात साधारण 17 हजार रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, खोडकीडीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बोगस बियाण्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली. कृषी विभागाने सर्व्हेक्षण केले असले तरी शेतकऱ्यांना अजून दिलासा मिळाला नाही. हिवरी गावातील शेख अन्सार यांच्या साडेतीन एकरावरील सोयाबीन असेच 50 टक्के पिवळे पडले असून त्याच्या खोडात खोडकीड आली आहे. शेख अन्सार यांनी शेतात साधारण 17 हजार रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, खोडकीडीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा तरी पीक परिस्थिती चांगली राहील अशी अपेक्षा होती. खरीप हंगामाच्या प्रारंभी बोगस बियाण्याने घात केला. पिकाची वाढ होत असताना खतांचा तुटवडा भासत आहे. आता किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हिवरी परिसरात 25 शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला. या हंगामात दुबार पेरणी करावी लागली. गोगलगायीने पाने कुरतडली. पाने पिवळी पडत आहेत. शेतकरी यातून वाचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. असा दावा नेहमीच कृषी विभागाच्या वतीने करण्यात येतो. प्रत्यक्षात कुणीही शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाही आणि पाहणी करीत नाही. हे वास्तव आहे. अधिकारी मात्र, कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानतात. कृषी विभागाने सर्व्हेक्षण केले. त्यात सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याचे दिसून आले. लोहक्षुष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे हा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्या शिफारशीनुसार फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला.