यवतमाळ-जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी ऑनलाइन सर्वसाधारण सभेला विरोध केला होता. सत्ताधारी गटाकडून सभागृहात सभा घेण्याची मागणी मान्य न करण्यात आल्याने सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. या सर्व प्रकारामुळे कोरोनाचे संकट कायम असताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. सभेत गोंधळ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सभेदरम्यान गोंधळ झाला. भाजपाने सर्वसाधारण सभा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत घ्यावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल सत्ताधारी पक्षाने न घेतल्याने भाजपा सदस्यांनी जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले.
ऑनलाइन सर्वसाधारण सभा न घेता सोशल डिस्टंन्सिंग पाळून नेहमी सारखी सभा घाव ,अशी विरोधी पक्ष भाजपाच्या सदस्यांची मागणी होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी मागणी मान्य न केल्याने भाजपा सदस्यांनी सभागृहात जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात करुन गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले. कोरोनाचे कारण देत ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात आली. मात्र, याच सभेत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. कोरोना विषाणू संसर्गा बाबत राजकारणी किती उदासीन आहेत याचा प्रत्यय आल्याचे दिसले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याच्या मार्गावर आहे.
भाजपाच्यावतीने ऑफलाइन सभा घेण्यात यावी यासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही. जिल्हा परिषदेत सुरु असलेली चुकीची कामे जनतेसमोर येऊ नये, यासाठी ऑनलाइन सभा घेण्यात येत आहे. यापुढे ऑफलाइन सभा न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे विकासकामे झाली पाहिजे, अशी अपेक्षा असते. आमच्या मागणीला सत्ताधाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निषेध करत ऑनलाइन सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी करत भाजपा सदस्य बाहेर पडले.