यवतमाळ - नेर तालुक्यातील सिरसगाव पांढरी येथे 1999 साली लघू सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. 14 किलोमीटर पर्यंत असलेल्या प्रकल्पाच्या कॅनलद्वारे आठ गावातील हजारो शेतकऱ्यांची शेती ओलित होईल यासाठी या प्रकल्पाची उभारणी झाली. मात्र, साडेचार किलोमीटरच्या पुढे कॅनलद्वारे सिंचन झाले नाही. त्यामुळे, कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पावर आणि त्याच्या डागडुजीवर होतोय ते कुणासाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंचन प्रकल्पातून पाण्याऐवजी पैशाचेच होतंय सिंचन; प्रकल्पावर आणि डागडुजीवर कोटींचा खर्च - सिरसगाव पांढरी सिंचन प्रकल्प
सिरसगाव पांढरी येथे 1999 साली लघू सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. 14 किलोमीटर पर्यंत प्रकल्पाचे कॅनल आहे. मात्र, साडेचार किलोमीटरच्या पुढे कॅनलद्वारे सिंचन झाले नाही. त्यामुळे, कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पावर आणि त्याच्या डागडुजीवर होतोय ते कुणासाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिरसगाव ते खानापूर असे 14 किलोमीटरपर्यंत या लघुसिंचन प्रकल्पाचे कॅनल आहे. मात्र, कॅनलमध्ये मोठ मोठे वाढलेली झाडे झुडपे आणि जंगली गवत आहे. आणि त्यात कधीही डागडुजी नीटपणे न झाल्यामुळे 14 किलोमीटर लांब असलेल्या कॅनलच्या पाण्याचा प्रवास हा साडेचार किलोमीटरवरच थांबला आहे. आणि पुढे झाड झुडपे आणि जमिनीला समतल झालेला कॅनल कित्येक वर्षे दुरुस्ती न झाल्यामुळे त्याचे पाणी नाल्यात वाहून जाते. शेतकरी 20 वर्षांपासून सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. कॅनलच्या शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांना कधीच डोळ्याने कॅनलचे पाणी पाहायला मिळाले नाही. कॅनलमधून सोडलेले पाणी साडेचार किलोमीटरच्या पुढच्या शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेताजवळून कॅनल जाऊनही त्याचा उपयोग काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
कॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होईल असे वाटले असताना त्याची अंमलबजावणी कुणीच केली नाही. या भागातील गावकऱ्यांनी अनेकदा सिंचन विभाग आणि लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाकडे व्यथा मांडल्या. मात्र, आश्वासनाच्या पुढे गावकऱ्यांना काहीच मिळाले नाही. रब्बी हंगामासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कॅनलमध्ये सोडले जाते. मात्र, पुढे सोडलेले पाणी कुठे जाते? याची दखल कॅनलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. या 14 किलोमीटरच्या कॅनलमधील माती काढणे, झाड - झुडपे साफ करणे, डागडुजी करणे यासाठी दरवर्षी शासन आठ ते नऊ लाख रुपयांचा खर्च करतो. ते पैसे कुठे जातात? हा प्रश्नही समोर येत आहे. सिरासगाव पांढरी येथील कॅनलच्या भागात माती व गाळ असून 10 किलोमीटर पर्यंत कॅनलचे पाणी शेतकऱ्यांना मिळते, असे शाखा अभियंता अग्निकुमार राठोड यांनी सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.