यवतमाळ- जिलह्यातील दिग्रस येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज बांधवांनी मूक मोर्चा काढला. तसेच बंजारा समाजाची होत असणारी बदनामी थांबवावी, या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारूनही मोर्चा काढण्यात आल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा दिग्रसमध्ये मूकमोर्चा
गुरुवारी वनमंत्री मांडणार भूमिका
संजय राठोड गुरूवारी (ता. १८) पोहरादेवी येथे येणार असून, माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच बंजारा समाज बांधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर विरोधी पक्षाने समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली आहे. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.